जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मंजूर विकास कामांचे श्रेय इतरांनी लाटू नये : आमदार संग्राम थोपटे
भोर : निरा देवघर धरणाच्या बंदिस्त डावा कालव्याचे भूमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते महुडे (ता. भोर) येथे करण्यात आले. कालव्यास २८ कोटी ४७ लाख ५८ हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. निरा देवघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रापासून होणार्या बंदिस्त पाईप लाईन डावा कालव्यामुळे महुडे खोर्यातील सुमारे बाराशे हेक्टर जिरायती शेती बारमाही ओलिताखाली येणार आहे. यामुळे याप्रसंगी स्थानिकांनी आमदार थोपटे यांचे आभार मानले.
या कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली ते म्हणाले, काही मंडळी जिल्हा नियोजनची मंजूर झालेली विकासकामे आम्ही केल्याचा आव आणत श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत, तसे पाहता जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य, तालुक्यातील सर्व समित्यांवर अध्यक्ष, विद्युत, पाणीपुरवठा, पंचायत समितीच्या वेगवेगळ्या विभागांवर अध्यक्ष म्हणून आमदार काम करत असतो. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लांबल्या असून, कालावधी संपल्याने त्या ठिकाणी प्रशासक नियुक्ती झाली. यामुळे काही मंडळींना कोणतेही पद, अधिकार नसतानाही जिल्हा नियोजन समितीच्या पोस्ट व्हायरल करत संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे श्रेय लाटणार्या विरोधकांनी आपल्या पदाची क्षमता ओळखून विकासाच्या वल्गना कराव्यात. निधी कोणी आणला, त्याला मंजुरी कोणी दिली आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा कोणी केला, हे भोर तालुक्यातील सुजाण जनता जाणते. त्यामुळे मंजूर विकास निधीचे श्रेय इतरांनी लाटू नये. असा टोला विरोधकांना त्यांनी यावेळेस लगावला.
या कार्यक्रमास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, माजी सभापती बाळासाहेब थोपटे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, भोर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गितांजली शेटे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अतुल किंद्रे, व्हा.चेअरमन अतुल शेडगे, भोर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दामगुडे, भोर तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष संजय (आबा )मळेकर, सुरेश राजीवडे, प्रवीण शिंदे, अंकुश खंडाळे, शिंदचे सरपंच शंकर माने, उपसरपंच अमर शेडगे, महुडे खुर्दचे सरपंच सोनाली कुमकर, भोलावडे विकास सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत चंदनशिव, कालवा समितीचे अध्यक्ष बबनराव खाटपे, जलसंपदा अधिकारी डी. एस. भावेकर आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, निरा देवघर डावा कालवा समितीचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.