भोर तालुक्यातील नेरे-वरवडी मार्गावर दुचाकी स्वाराचा ओढ्यात पडून मृत्यू
भोर : तालुक्यातील वीसगाव खोरे भागातील नेरे ते वरवडी मार्गावर दुचाकीस्वार दुचाकीसह ओढ्यात पडून अपघात झाला असून अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गुरुवार (दि. २ नोव्हेंबर) रोजी घडली आहे. शांताराम मारुती पवार (वय ६२) रा.बसरापूर असे ठार झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव असून घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
याप्रकरणी तानाजी बाबुराव कोंढाळकर रा. अंबाडे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे मयत शांताराम मारुती पवार यांच्यासोबत तालुक्यातील वरवडी खुर्द येथे नातेवाईकांचा तेराव्याचा विधी कार्यक्रम करून मोटारसायकलने घरी जात होते.त्या दरम्यान दुचाकी नेरे गावच्या हद्दीत ओढ्याच्या पुलावर रस्त्यावर आल्यानंतर बंद पडली. यातील मयत इसम यांनी फिर्यादी यांना गाडी बंद पडली म्हणून गाडीच्या खाली उतरायला सांगितले व गाडीच्या वायर तपासनी करून गाडीवर बसून गाडीचा स्टार्टर मारला त्यावेळी अचानक गाडी स्टार्ट झाली व गाडीची रेस होऊन त्यांना गाडी कंट्रोल झाली नाही व ते गाडीवरून गाडीसह ओढ्याच्या पुलावरून खाली ओढ्यात पडले. फिर्यादी यांनी मयत इसमास पोलिस व गावातील लोकांच्या मदतीने उपचाराकरता उपजिल्हा रुग्णालय भोर येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी सदर इसमास मयत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास हवालदार यशवंत शिंदे करीत आहेत.