धोम-बलकवडी कालव्याच्या प्रवाहात अजनुज(खंडाळा) येथील बापलेक गेले वाहून; मुलाचा मृत्यू, तर वडील बेपत्ता

खंडाळा : धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्याच्या प्रवाहात साताऱ्यातील अजनुज (ता. खंडाळा) येथील बापलेक वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शंभुराज विक्रम पवार (वय ५ वर्ष) आणि विक्रम मधुकर पवार (वय ३२ वर्ष) हे बापलेक कालव्यात वाहून गेले. या घटनेत शंभुराज याचा मृत्यू झाला, तर विक्रम हे बेपत्ता आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा फलटण तालुक्यातील विविध गावांची पाण्याची मागणी असल्याने चारच दिवसांपूर्वी धोम-बलकवडी धरणातून कालव्याला पाणी सोडले होते. कालव्याला पाणी आल्याने पवार कुटुंबीय हे घरातील अंथरुणे घेऊन धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी ५ वर्षाचा शंभुराजही त्यांच्याबरोबर गेला होता. शंभूराज पाण्याजवळ उभा असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि कालव्याच्या पाण्यात पडून वाहून जाऊ लागला. ही घटना लक्षात येताच त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील विक्रम यांनी पाण्यात उडी मारली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने ते दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

Advertisement

शंभुराज हा घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटरवर पाण्यातून वाहताना दिसला. त्यावेळी बचाव कार्यासाठी आलेल्या खंडाळा-शिरवळ रेस्क्यू टीमच्या तरुणांनी पाण्यात उड्या मारून त्याला बाहेर काढले. त्याला तातडीने खंडाळा येथील मानसी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला. विक्रम पवार यांचा पोलीस, रेस्क्यू टिम आणि नागरिकांनी शोध घेतला. मात्र, संध्याकाळपर्यंत ते सापडले नव्हते. ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीमने शोधकार्य सुरुच ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page