नसरापूर येथे पाण्याच्या टाकीत पडलेल्या मोराचे वाचवले प्राण; भोर तालुका सर्पमित्र संघटनेचे सर्व स्तरातून कौतुक
नसरापूर : पाण्याच्या शोधार्थ आध्यत्मिक जीवन केंद्र, नसरापूर(ता.भोर) येथील टाकीत पडलेल्या मोराचे तेथील कर्मचारी आणि भोर तालुका सर्पमित्र संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवत प्राण वाचवले. त्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, संघटनेचे कौतुक होत आहे.
नसरापूर येथील आध्यत्मिक जीवन केंद्रातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मंगळवारी(दि. १८ जून) रात्री १० वाजता मोर हा पक्षी पडलेला असल्याची घटना तेथील कर्मचारी अमोलिक सर यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्प रक्षक असोसिएशन चे सर्पमित्र श्रीकांत खेडकर यांच्याशी संपर्क साधला आणि लवकरात लवकर येऊन त्यास वाचवण्याची विनंती केली. त्यांनी या घटनेची माहिती भोर तालुका सर्पमित्र संघटना अध्यक्ष विशाल शिंदे यांना कळवली. त्यांनी लगेचच रोहन कोळी, रोहन चाळेकर, राहुल मालुसरे, प्रदीप रणपिसे, सुरज कसबे, रोहित गायकवाड, वन विभागाचे वन मजुर सागर आखाडे यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेत टाकीतून मोराला सुखरूप पणे बाहेर काढले. त्यास कोणती ईजा झाली आहे का सर्व पाहणी करून बुधवारी(दि. १९ जून) सकाळी ११ च्या सुमारास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या घटनेमध्ये सर्वांनी दाखविलेल्या समयसूचकतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.