राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची विविध ठिकाणी गावठी हातभट्ट्यांवर छापेमारी; तब्बल आठ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त
सासवड : राज्य उत्पादन शुल्क विभागीय उप आयुक्त सागर थोमकर यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारु निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने मोहीम सुरु केली आहे. शनिवारी(दि. १० फेब्रुवारी) व रविवारी(दि. ११ फेब्रुवारी) विविध ठिकाणी अवैद्य गावठी हातभट्ट्यांवर छापेमारी करून आठ गुन्हे दाखल केले आहेत.

यावेळी त्यांनी पुरंदर आणि हवेली तालुक्यातील सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळीब, राजेवाडी व आंबळ आदी ठिकाणी छापेमारी करून त्यामध्ये त्यांनी ५ वारस व ३ बेवारस असे एकूण ८ गुन्हे दाखल केले आहेत. सदर कारवाईमध्ये ९९५ लिटर गावठी हातभट्टीची दारु, २५ हजार लिटर रसायन, ३ दुचाकी वाहने तसेच हातभटटी दारु निर्मीतीचे साहीत्य असा एकुण अंदाजे ७ लाख ९० हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून पसार झालेले असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. यापुढे देखील अशाच प्रकारच्या मोहिमा सुरु राहणार असून अवैध दारु व्यवसायावर सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

सदरची कारवाई दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्हि. एम. माने, ए. आर. दळवी, एस. एस. पोंधे, ए. आर. थोरात, यु. आर. वारे, यांनी केली आहे. पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे.