चाऱ्या अभावी पुरंदरमधील शेतकरी हवालदिल
पुरंदर : चालूवर्षी पुरंदर तालुक्याच्या सर्व गावांमध्ये पावसाळ्यातच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगामातील मका, बाजरी, कडवळ, हत्ती घास, मेथी घास आदी पिके जळून खाक झाली होती.
त्यामुळे आगामी काळात जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी पशुधन सांभाळणार्या शेतकर्यांची एकमेकांच्या नातेवाइकांकडे चारा मिळेल का चारा ? याबाबत शोधाशोध सुरू असल्याचे चित्र पुरंदर तालुक्यात आहे.
पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने व सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी असल्याने नद्या-नाले, ओढे, तलाव, बंधारे, विहिरींनाही पाणी आले नाही. परिणामी, या पिकांना पाणी देता न आल्याने शेतातील पिके जळून खाक झाली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांपासून मिळणारे उत्पन्न तर दूरच; परंतु केलेला खर्चही निघाला नाही. आता रब्बीच्या पेरण्या करण्याच्या तयारीत शेतकरी होता. मात्र, विहिरींची पाणी पातळी कमालीची खालावली असल्याने, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ज्वारी, मका किंवा घसवर्णीय पिके घेणे आता गरजेचे असताना शेतकरी तसे धाडस करताना दिसत नाहीत. यावर्षी डोंगर माथ्यावरही गवत उगवले नसल्याने जनावरे चरण्यासाठी ही नेता येतं नाहीत.
अनेक शेतकरी शेजारील दौंड, बारामती, पुरंदर व भोर तालुक्याच्या सीमेवरील काही गावातील तसेच पुणे- सातारा जिल्ह्यातील सीमेवरील गावातील नातेवाइकांकडे चारा मिळविण्यासाठी शोधाशोध सुरू असून, मिळेल त्या किंमतीत चारा जमा करण्यासाठीची लगबग सुरू आहे. वाहतूक खर्च बघता पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत एक ट्रॉली चारा उपलब्ध होत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.