पुणे शहरात जड वाहनांना ५ मार्चपासून नो एन्ट्री! कसा असेल बदल, वाचा सविस्तर
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात शहरातील अनेक ठिकाणी मेट्रो आणि रस्त्याची कामे चालू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याच पार्श्वभूमीवर जड वाहनांना ५ मार्चपासून नो एन्ट्री लावण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांवर उद्यापासून बंदी लावण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. जड वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना पुणे पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. पुण्यातून बाहेर पडण्यासाठी जड वाहनांना आता पर्याय मार्ग वापरावा लागणार आहे. प्रवेश बंदी असल्याने नियमांचे उल्लंघन केल्यास दंड अथवा कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पिंपरी-चिंचवड-पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी लावण्यात आली आहे. वाघोली ते पुणे शहराच्या दिशेने जड वाहनांना २४ तास प्रवेश करता येणार नाही. याऐवजी शिक्रापूरहून चाकण मार्गे पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव दाभाडे मार्गे मुंबई आणि अहमदनगरकडे जड वाहनांना जाता येणार आहे.
पुण्याहून सोलापूरला जाण्यासाठी थेऊर फाटा येथून लोणीकंद, शिक्रापूर मार्गे जावे लागेल. पुणे-सासवड असा ज्या जड वाहनांना प्रवास करायचा आहे, त्यांना हडपसर मार्गे थेऊर फाटा इथून प्रवास करता येईल. तिथून लोणीकंद, शिक्रापूर मार्गे प्रवास करता येणार आहे.