भोर तालुक्यातील तरूणांनी मध्यरात्री पाठलाग करुन कत्तलीसाठी चालवलेली जनावरे पकडून दिली भोर पोलिसांच्या ताब्यात
भोर : भोर तालूक्यातील परहर बु. या गावातून बेकायदेशीररित्या ४ कोकणी गोवंश जातीचे जनावरे (बैल) वाहतुक करून पिकअप टेम्पोमधून कत्तलीसाठी फलटण येथे चालवलेली असता अक्षय विठ्ठल पवार (वय 28 वर्षे रा. उत्रौली ता. भोर जि. पुणे) व त्यांचे सहकारी प्रविण विठ्ठल ढवळे (रा. गुढे ता. भोर जि. पुणे), कमलेश मळेकर (रा. निगुडघर ता. भोर जि. पुणे), शुभम किसन तळेकर (रा. महूडे ता. भोर जि. पुणे) यांनी जनावरे व टेम्पो पकडून भोर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय पवार व त्याच्या सहकाऱ्यांना आज शनिवारी (२३ डिसेंबर) मध्यरात्री परहर बु. (ता. भोर जि. पुणे) या गावातुन बेकायदेशीररित्या जनावरे वाहतुक करणारी पिकअप गाडी (एम एच ११ सी एच ३७०६) येत आहे, अशी माहिती मावळा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रवीण ढवळे यांनी दिली होती. अक्षय पवार हा मिलींदभाऊ एकबोटे यांचे अध्यक्षतेखाली समस्त हिंदू आघाडी संघटनेचे काम करतो. माहिती मिळताच अक्षय व त्याचे सहकारी भोर तालुक्यातील परहर बु. येथे पोहोचले. अक्षय व त्याचे सहकारी परहर बु. येथे सोमजाई माता मंदीराजवळ थांबले असताना त्यांना परहर बाजुकडुन एक पांढरे रंगाची पिकअप गाडी येताना दिसली. सदर गाडी ही बेकायदेशीर जनावरे वाहतुक करणारी असल्याचा संशय आल्याने त्यांनी सदर गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असताना वाहन चालकाने गाडी त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला तरीही गोरक्षक अक्षय व त्याच्या सहकाऱ्यांनी मागे न हटता जीवाची बाजी लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थोड्या अंतरावर सदर जनावरे वाहतुक करणारी गाडी जागेवर उभी करून ती तशीच जनावरांसह सोडुन गाडी वरील चालक व त्याच्या सोबतचा एक साथीदार हे अंधाराचा फायदा घेवुन माळरानावर पळून गेले.
त्यानंतर अक्षय व त्याच्या सहकाऱ्यांनी सदर गाडीत पाठीमागे हौद्यात पाहीले असता, गाडीमध्ये २ तांबड्या रंगाचे अंदाजे ५ वर्षे वयाचे कोकणी जातीचे बैल व १ तांबड्या रंगाचा अंदाजे दीड वर्षे वय असलेला खोंड तसेच १ काळ्या रंगाचा अंदाजे दीड वर्षे वय असलेला खोंड अशी एकुण ४ कोकणी जातीची गोवंश जातीचे जनावरे (बैल) ही दाटीवाटीने कोंबुन त्यांची चारापाण्याची कोणतीही सोय न करता त्यांचा छळ करून कत्तल करण्यासाठीच नेऊन वाहतुक करताना मिळुन आले. तेंव्हा अक्षय ने स्वतः ११२ वर कॉल करून सदर घडलेल्या घटनेबाबत भोर पोलीस स्टेशनचे पोलीसांना माहीती दिली. त्यानंतर काही वेळातच भोर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर भोर पोलीस, अक्षय व सहकाऱ्यांनी सदरचे बेकायदेशीर जनावरे वाहतुक करणारी पिकअप गाडी त्यामधील जनावरांसह भोर पोलीस स्टेशन येथे मध्यरात्री ३ च्या सुमारास आणली. फिर्यादी अक्षय च्या सांगण्यावरून वाहन चालक व त्याचा एक अनोळखी साथीदार यांच्याविरूद्ध भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.