धनकवडी येथे ३८ वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला, तिघांवर गुन्हा
पुणे : जुन्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना पुण्यातील धनकवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सागर भाऊशेठ सोनवणे (वय ३८, रा. नटराज सोसायटी जॉईन ग्रुप एक) असे पीडित तरुणाचे नाव असून आरोपी साई मंगेश नार्वेकर (वय २०), श्रुती मंगेश नार्वेकर (वय २२), मंजिरी मंगेश नार्वेकर (वय ५०, तिघे रा. नटराज) सोसायटी, धनकवडी) यांच्यावर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे व नार्वेकर कुटुंबीयांमध्ये आरोपी मंगेश व वैभव डेरे हे जॉईन ग्रुपचे रहिवासी असल्याने भांडण झाले, तर सोनवणे यांनी मध्यस्थी करून भांडण शांत केले. त्यावेळी मंगेशने सोनवणे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. सोनवणे यांच्या पत्नी व बहिणीने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी श्रुती व तिची आई मंजिरी यांनी सोनवणे यांच्या पत्नी व बहिणीला मारहाण केली.याप्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.