महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र बनेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी; सुप्रिया सुळेंचीही दर्शनासाठी उपस्थिती
नसरापूर : महाशिवरात्री निमित्त नसरापूर येथील श्री क्षेत्र बनेश्वर(ता.भोर) महादेव मंदिरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती. सायंकाळी उशीरा पर्यंत दर्शनबारीच्या रांगेतुन सुमारे लाखभर भविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वा निमित्त नसरापूर येथील बनेश्वर मंदिरात पहाटे पासुनच भाविकांची रांग लागली होती. पहाटे १२ वाजून १५ मिनिटांनी भोरचे तहसिलदार सचिन पाटील यांच्या हस्ते शासकीय अभिषेक करण्यात आला, यावेळी नायब तहसीलदार अरुण कदम आणि श्री बनेश्वर महादेव ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम दातार, उपाध्यक्ष हनुमंत कदम, पदाधिकारी अनिल गयावळ, प्रकाश जंगम, अनिल कदम, काशीनाथ पालकर, सतिश वाल्हेकर, ज्योती चव्हाण, प्रसन्न गयावळ, नवनाथ शिर्के, सुशील विभुते तसेच सर्व विश्वस्त उपस्थित होते.
मंदिराचे पुजारी यांनी पुजा केल्यावर पहाटे सहा नंतर अभिषेक बंद करण्यात येवुन बाहेरील गाभाऱ्या मधुन दर्शनबारी सुरु करण्यात आली. संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती. तर ट्रस्टच्या वतीने दर्शनबारी साठी मंडप, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व प्रसाद वाटप करण्यात येत होता. यासाठी मंदिराचे विश्वस्त मंदिर परिसरात थांबुन व्यवस्थेची पाहणी करीत होते. मंदिर परिसरात राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार अजित माने, भगीरथ घुले यांच्यासह होमगार्ड तैनात करण्यात आले होते.
नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक देखिल तैनात होते मंदिर परिसरातील वन उद्यानात होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभुमीवर वनविभागाचे कर्मचारी देखिल उपस्थित होते. मंदिराच्या मुख्य दरवाज्या पासुन नसरापूर गावा पर्यंत एक किलोमिटर अंतरावर दोन्ही बाजुस यात्रेची खेळणी, खाऊ, पुस्तके, आईस्क्रीम यांची दुकाने सजली होती. दर्शनबारीची रांग सांयंकाळी उशीरा पर्यंत मंदिराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर पर्यंत दिसत होती. दिवसभरात सुमारे लाखभर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचा अंदाज उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
सुप्रिया सुळेंनीही घेतले दर्शन
महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री क्षेत्र बनेश्वर(ता.भोर) येथे भेट देऊन शिवलिंगास अभिषेक करुन सुप्रिया सुळेंनीही दर्शन घेतले. मंदिरात १०:३५ वाजता सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.