कुंटणखाना चालविणाऱ्या “गोकुळ लाॅज”वर पोलिसांचा छापा; पिडीत महिलेची सुटका तर चालक ताब्यात
शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ(ता.खंडाळा) जवळ कुंटणखाना सुरू असलेल्या गोकुळ लॉजवर छापा टाकत उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या पथकाने वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी लॉज मालक व एक पिडीत महिला अशा दोन जणांना शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत वैभवी भोसले निर्भया पथक फलटण यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरवळ पोलीसांकडुन मिळालेली माहिती अशी की, आज शुक्रवार(दि.८ मार्च) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांना गोपनीय माहिती मिळाली की, हॉटेल गोकुळ लॉज वर वेश्या व्यवसाय सुरू आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री करण्यासाठी त्यांनी डमी ग्राहक हॉटेल मध्ये पाठवले. हॉटेलमध्ये कुंटणखाना सुरु असल्याची खात्री पटताच डमी ग्राहकाने पोलिसांनी आधी दिलेल्या सुचनेनुसार इशारा केला. तोच पोलिस पथकाने धाव घेत या हॉटेलवर छापा मारला. त्यानंतर केलेल्या चौकशीवरून हॉटेल चालक महिलेकडून वेश्या व्यवसाय करत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी चालक विनोद गोविंद अग्रवाल(वय ५२ वर्ष, रा. धनगरवाडी, ता.खंडाळा) यांच्यासहित पिडीत महिलेला ताब्यात घेतले असून चालकावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई ही उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस हवालदार आहीवळे, पो.काँ. लवटे, कुदळे, कोळेकर, पो.ना शेख यांच्या पथकाने केली आहे.