खळबळजनक! कात्रज परिसरात बनावट स्कॉचच्या कारखान्यावर छापा, साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
कात्रज : पुण्यातील कात्रज (आंबेगाव) परिसरात बनावट स्कॉच कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. अधीक्षक चरणसिंग राजपूत याच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाकेबाज कारवाई केली आहे. पुणे पोलीस व प्रशासन यांची डोळेझाक करून चालणारा बनावट स्कॉच कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी तब्बल १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज देहू रोड बायपास, या ठिकाणी छापा घातला असता, या ठिकाणी बनावट परदेशी स्कॉचच्या एकूण ३४ सिलबंद बाटल्या, ५५१ रिकाम्या बाटल्या, बाटल्यांचे बुचे, दोन दुचाकी वाहने, मोनोकार्टून, हिट गन (हेअर ड्रायर), इंडक्शन (शेगडी), प्लॉस्टिक पॅकिंग रोल, प्लॉस्टिक चिकटपटटी आणि मोबाईल फोन असा एकुण अंदाजे १० लाख ३९ हजार ४७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.महेशभाई हरिभाई कोळी (रा.फलॅट नं.१७, ३रा मजला, बालाजी हाईटस, मंगळवार पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मद्य पार्सलद्वारे मुंबई व इतर शहरामध्ये पाठविले जात होते तसेच दुचाकीचा वापर करून पुणे शहरात त्याची विक्री केली जात होती, परदेशी बनावटीचे मद्य वापरण्यात आलेल्या रिकाम्या बाटल्यातून पुन्हा भरून त्याची विक्री केली जात होती अशी माहिती आरोपीने दिली आहे.
पोलीस निरीक्षक, आर.पी.शेवाळे, दुय्यम निरीक्षक एन.एन. मारकड, सहायक दुय्यम निरीक्षक एस.एस. लोहकरे, एस.एस. इंदलकर जवान-नि-वाहनचालक, जवान शरद भोर, गोपाल कानडे, व महिला जवान उज्वला भाबड यांनी ही कारवाई केली. याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क सी विभागाचे निरीक्षक राजाराम प्रभु शेवाळे हे करीत आहेत.