भोर तालुक्यातील ५४ पदवीधर शिक्षकांची पदे होणार अतिरिक्त; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची होणार वाताहात
भोर : १५ मार्च २०२५ च्या धोरणानुसार संचमान्यतेच्या (आकृतीबंधाच्या) नवीन निकषानुसार भोर तालुक्यातील सुमारे ५४ पदवीधर शिक्षक अतिरिक्त होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वाताहात होणार आहे. त्यामुळे तालुक्याच्या दुर्गम भागातील ५४ शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीच्या दीड हजाराहून जास्त विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येणार आहे.
तालुक्यात २७० प्राथमिक शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांची मंजूर संख्या १७९ आहे. त्यापैकी १४० पदवीधर शिक्षक कार्यरत असून ३९ पदवीधर शिक्षक रिक्त आहेत. मात्र, नवीन निकषांनुसार पदवीधर शिक्षकांची संख्या ही ७३ राहणार आहेत. नवीन निकषांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या (उच्च प्राथमिक) २० पट पटसंख्या असलेल्या शाळेवर २ पदवीधर शिक्षक असणार आहेत.
तालुक्यातील सहावी ते आठवीपर्यंतच्या ९० शाळांपैकी केवळ ३६ शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ही २० पेक्षा जास्त आहे. मात्र, ५४ शाळांमध्ये ही पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. म्हणून त्या ठिकाणी पदवीधर शिक्षकांची नेमणूक केली जाणार नाही. त्यामुळे सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागेल.
सध्या तालुक्यात पहिली ते चौथी आणि पहिली ते सातवीपर्यंतच्याच शाळा आहेत. नवीन आकृतीबंधानुसार पहिली ते पाचवी आणि पहिली ते आठवी अशी रचना असणार आहे. तालुक्यात उदयखानवाडी व मानटवस्ती या दोन्ही शाळांमध्ये अजून एकही शिक्षक नाही.
परंतु, तालुक्याच्या ग्रामीण भागात जवळपास उच्च प्राथमिक शाळा किंवा माध्यमिक शाळाच नाहीत. असल्या तरीही वाहतूक व इतर व्यवस्था नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जर विद्यार्थ्यांना इतर शाळेत जाता आले नाही, तर त्याच शाळेतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या शिक्षकांना सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे. संबंधित शाळेवरील शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त भार होणार आहे.