मुळशीतील एका गावात चक्क मंदिराचेच मतदार म्हणून नाव; प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
मुळशी : निवडणूक आयोगाने त्यांच्या कारभारात कितीही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला असला तरी बऱ्याचदा त्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. असाच एक प्रकार मुळशी तालुक्यात निदर्शनास आला आहे. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यातच बारामती लोकसभा निवडणुकीच्या चर्चा तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगू लागल्या आहेत. याच बारामती लोकसभा मतदारसंघात भोर विधानसभाअंतर्गत मुळशी तालुक्याचा समावेश होतो. याच मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे गावातील मतदार यादीमध्ये चक्क मंदिरालाही मतदार बनविण्यात आले आहे. मतदार यादीत मतदाराचे नाव “सूर्यमुखी मंदिर” आणि वडीलांचे नाव “गणेश मंदिर” असून त्याला मतदार क्रमांकही दिला आहे. बोगस मतदारांच्या नावाबरोबरच मुळशी तालुक्यात आता देवालाही मतदार केल्याचा अजब प्रकार आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुळशी तालुक्यात हिंजवडी पट्ट्यात म्हाळुंगे हे उपनगर बनत चाललेले गाव वसले आहे. या गावातील मतदार यादीत भाग क्रमांक १०५ मध्ये २४० क्रमांकावर मतदाराचे नाव “सूर्यमुखी मंदिर” असे छापण्यात आले आहे. तर त्यांच्या वडीलांचे नाव “गणेश मंदिर” असे लिहिले आहे. तसेच हा मतदार महिला असल्याचेही नमूद केले आहे. त्याचा मतदार क्रमांक ‘झेडएलओ ८८६००६६’ असा आहे. विशेष म्हणजे या मतदार यादीतील काही नावे गुजराती भाषेत छापली गेली आहेत. याबाबत मुळशी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांची भेट घेऊन मतदार यादीतील हा घोळ त्यांच्यापुढे मांडला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन खैरे, शिवाजी बुचडे, सविता दगडे, कोमल वाशिवले, दीपाली कोकरे, विठ्ठल पडवळ, निकीता सणस, स्वाती ढमाले, संतोष मोहोळ, राम गायकवाड, रूपाली अमराळे आदी उपस्थित होते.
निवडणूक यादीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदार यादीत नाव प्रसिद्ध करताना ही बाब लक्षात कशी आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करताना नाव व पत्ता भरताना नजरचुकीने हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरीत मतदार यादीतील नाव, छायाचित्र, पत्ता बदल होणे हे नवीन नाही. परंतु एखाद्या मंदिराचे नाव यादीत मतदार म्हणून समाविष्ट होणे हे पहिल्यांदाच घडले आहे.