वीसगाव खोऱ्यातील गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद; काही गावच्या यात्रेमुळे दौरा स्थगित केल्याचे रणजीत शिवतरे यांनी केले स्पष्ट
भोर : बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत निश्चित झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गावभेट दौरा आणि प्रचार सभेचा तडाखा लावला आहे. या दरम्यान बुधवारी(दि. ३ एप्रिल) वीसगाव खोऱ्यातील गावात महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता. दररोज हे दौरे असल्यामुळे मंगळवारी(दि. २ एप्रिल) झालेल्या दौऱ्याला रात्री उशीर झाला. आणि त्यामुळे सकाळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी दौऱ्यानिमित्त जमायला वेळ लागल्यामुळे बुधवारी १०:३० वाजता बालवडी गावात होणार असणाऱ्या दौऱ्यास दुपारी १ वाजले असल्यामुळे आणि त्यात वीसगाव खोऱ्यातील नेरे गावची यात्रा असल्यामुळे बालवडी गावचे ग्रामस्थ गावात उपस्थित नव्हते त्यामुळे फक्त बालवडी गावातील गाव भेट दौऱ्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषद माजी सदस्य रणजीत शिवतरे यांनी दिले.
दरम्यान, गोकवडी गावातून सुरू झालेल्या या दौऱ्यात ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचेही शिवतरे यांनी या वेळी स्पष्ट केले.
त्यानंतर पुढे आंबाडे गावात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गेले असता आंबाडे ग्रामस्थांनीही जोरदार स्वागत करून उत्स्फूर्त प्रतिसाद या गावभेट दौऱ्यास दिले असल्याचेही रणजीत शिवतरे यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर मात्र नेरे गावची यात्रा असल्यामुळे त्या गावास भेट न देता. तसेच वरवडी बु., वरवडी डाय., वरवडी खु. या तीनही गावासहित पाले येथील ग्रामस्थांची पाले गावात सभा पार पडली. त्यामुळे या गावांचा गावभेट दौरा रद्द झाला असे म्हणता येणार नसल्याचेही शिवतरे यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण गावभेट दौऱ्यासाठी सायंकाळ झाली, त्यामुळे नेरे येथे कुस्त्यांच्या फडासाठी पुढे जायचे असल्यामुळे. राहिलेल्या दोन गावांचा गावभेट दौरा पुढे ढकलला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत लवकरच वीसगाव खोऱ्यातील गावांचा गावभेट दौरा बुधवारी(दि. १० एप्रिल) होणार असल्याचेही रणजीत शिवतरे यांनी यावेळेस स्पष्ट केले.