संत ज्ञानेश्वर महाराजांचा २९ जूनपासून पालखी सोहळा
पंढरपूर : आषाढी वारीची वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून यंदाच्या आषाढी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजाचा पालखी सोहळा २९ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. १७ जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे.
आषाढी यात्रेसाठी वारकरी वाट पाहत असतात. मंदिर समितीकडून यासाठीची तयारी केली जात असते. या अनुषंगाने आषाढी यात्रा नियोजनासाठी परंपरेप्रमाणे आज पंढरपूर येथील माऊली मठात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजनाथ यांनी याबाबत माहिती दिली.
२१ जुलैला परतीचा प्रवास
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २९ जून रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. तर १७ जुलै रोजी पंढरपुरात एकादशीचा सोहळा होईल. चार दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपल्यानंतर २१ जुलैला पालखी सोहळा आळंदीच्या प्रवासाला निघणार आहे.