भारत सरकारच्या “नोटरी पदी” ॲड. अर्चना किंद्रे यांची निवड
सासवड : केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाच्यावतीने ॲड. अर्चना किंद्रे यांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ॲड. अर्चना किंद्रे या मूळच्या भोर तालुक्यातील बालवडी या गावच्या असून गेली अनेक वर्ष त्या दिवाणी व फौजदारी न्यायालय, सासवड आणि भोर येथे वकिली करत आहेत. जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत करण्याची तयारी या सर्वांच्या जोरावर त्यांनी हे यश कमाविले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पुरंदर तालुक्यातील नागरिकांना कमीतकमी खर्चामध्ये नोटरीची कामे करून मिळणार आहेत.
पुरंदर आणि भोर तालुक्यातील गोर-गरीब व सर्वसामान्य नागरीकांची गहाणखते, शपथपत्रे, आर्थिक व्यवहाराची वैधता अशी अनेक कायदेशीर कागदपत्रे विनाविलंब प्रमाणित करून देण्यात ॲड. अर्चना किंद्रे यांचे मोलाचे योगदान असते तसेच त्यांच्या कडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय्य वागणूक देऊन त्यांच्याकडील कागदपत्रांच्या व माहितीच्या आधारे खरी व सत्य माहिती परखडपणे सांगून योग्य तो कायदेविषयक सल्ला देऊन समाधानाने प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या अविरत झटत असतात. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या वकील म्हणून ॲड. अर्चना किंद्रे यांना ओळखले जाते. त्यामुळे भारत सरकारने त्यांची नोटरी पब्लिकपदी निवड करून हक्काच्या माणसाची वर्णी लावल्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी दिल्या शुभेच्छा
ॲड. अर्चना किंद्रे यांच्या अभ्यासू, कार्यक्षम व्यक्तीमत्वाची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झाल्यामुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच सामाजिक, राजकीय, विधी व न्याय क्षेत्रातील कार्यात सुयश त्यांच्या हातून अशीच सर्वसामान्य नागरीकांची व न्याय देवतेची सेवा घडो अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.