पुण्यातील शेतकऱ्यांचे १८ लाख लुटनाऱ्या तिघांना साता-यात जेरबंद
सातारा : १८ लाखाचा कांदा विकून शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना सातारा पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पाेलीसांनी माल वाहतुक गाडीच्या चालकासह एकूण तीन जणांना अटक केली आहे.
उपविभागीय पोलिस अधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनूसार दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल १८ लाख रुपयांची चोरी साताऱ्यातील वाढे फाटा येथे झाली होती. कांदा उत्पादक शेतकरी बेळगाव येथे कांदा विकून पुन्हा पुण्याला निघाले हाेते.
त्यांच्या वाहनातून चोरट्यांनी १८ लाख रुपये लंपास केले होते. त्याबाबत पाेलीसांत तक्रार नाेंदवली गेली हाेती. सातारा पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. शेतकऱ्यांचा सोबत असणा-या वाहन चालकाने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे समोर आले आहे. या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीची रक्कम देखील हस्तगत करण्यात आली आहे.