ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मानधनात ३ हजारांनी वाढ
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : मागील १२ वर्षापासून संगणक परीचालकांच्या विविध मागण्यांच्या प्रलंबित निर्णयाला दिलासा देत ग्रामपंचायत संगणक परीचालकांच्या मानधनात तीन हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठक संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यामुळे संगणक परीचालकांना दिलासा मिळणार आहे.
मागील हिवाळी अधिवेशनावर ग्रा.पं. संगणक परीचालकांनी मोर्चाचे आयोजन महाराष्ट्र राज्य ग्रा.पं. संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत राठोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. त्याअगोदर पं. स. समोर ठिय्या आंदोलन, जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन, हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा, अर्धनग्न आंदोलन, मुंडन आंदोलनांनी शासनाचे लक्ष वेधले होते.
अधिवेशनादरम्यान आंदोलक संगणक परीचालकांना खुल्या कारागृहात बंदीस्त केल्यामुळे विरोधकांनी संगणक परिचालकांच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर सरकारकडून संगणक परीचालकांसाठी सुधारित धोरण लागू करण्यात येईल अशी शासनाने ग्वाही दिली होती. १० नोव्हेंबर २०२३ पासून आपल्या विविध मागण्यांसाठी संगणक परीचालकांनी संप पुकारला होता तसेच हिवाळी अधिवेशन संपूनही शासनाने केलेल्या घोषणेची कुठेही अंमलबजावणी होत नसल्याचे पाहून महाराष्ट्र राज्य ग्रा.पं. संगणक परिचालक संघटनेने नागपूर येथे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर उपोषण केले होते. त्याचा धसका शासनाने घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देत उपोषण सोडण्याची विनंती केली आणि उपोषण सोडले. ग्रा.पं. संगणक परीचालकांवर शासनाची एजन्सी असलेल्या कंपनीने मानसिक व आर्थिक शोषण केल्याचे पुरावे संघटनेच्या वतीने शासनाला सादर करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेच्या मागणीची दखल देत एस २ इन्फोटेक या कंपनीला घरचा रस्ता दाखविला होता. त्यानंतर सरकार धोरणात्मक निर्णय कधी घेईल याचा मागील काही दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. मात्र काल शासनाने संगणक परीचालकांच्या मागणीची दखल घेत संगणक परिचालकांच्या मानधनात तीन हजाराने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.