ऊरळी कांचन येथे दिवसाढवळ्या १० वर्षीय मुलीचे अपहरण; सीसीटीव्ही फुटेज समोर
उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील ऊरळी कांचन येथील खामगाव टेकमध्ये एका १० वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे. खामगाव टेक ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पायल सुनिल धुळे (वय १० वर्ष, रा. खामगाव टेक, ता. हवेली) असे अपहरण करण्यात आलेल्या मुलीचं नाव आहे. याप्रकरणी सुनील बाळू धुळे (रा. खामगाव टेक, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
खामगाव टेक परिसरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पायल ही तिचे चुलते आणि चुलती यांच्याबरोबर बाहेर गेली होती. यावेळी एक इसम हा पायल आणि तिच्या चुलत्याजवळ आला. यावेळी त्याने चुलत्याला बोलून या ठिकाणची त्या ठिकाणची ओळख सांगितली. पायलच्या काकाला बोलण्यात गुंतवलं. त्याचबरोबर बोलत बोलत मुलीची सर्व माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्या इसमाने मुलीच्या काकाला मोठ्या प्रमाणात दारू पाजली. त्यानंतर चलाखीने पायलला दुचाकीवर बसविले आणि त्या ठिकाणावरून निघून गेला. यावेळी काकीने सदर घटना मुलीच्या वडिलांना सांगितली.
यावेळी परिसरातील खामगाव टेक आणि तसेच परिसरातील कंपनी, माजी सरपंच यांच्या घराशेजारील सीसीटीव्ही तपासले. सहजपूर परिसरातील सीसीटीव्हीत एक इसम मुलीला दुचाकीवरुन घेऊन जात असल्याचा दिसला. दरम्यान, यावेळी एक इसम हा मुलीला दुचाकीवरून घेऊन जाताना दिसून आला आहे. त्याच्या गाडीचा नंबर थोड्या प्रमाणात दिसत आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्याविरोधात तक्रार देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच सदर आरोपी व मुलगी कोठे आढळून आल्यास उरुळी कांचन पोलीसांशी तसेच नातेवाईक वडील ९५२९०३००४५ व ९१७२५९१८२० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.