क्रिकेट खेळताना अंगावर वीज पडून १७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
सासवड : क्रिकेट खेळत असताना अंगावर वीज पडून एका १७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पठारवाडी (ता. पुरंदर) येथे सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शुभम सोमनाथ चौधरी(रा. पठारवाडी, ता. पुरंदर) असे अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पठारवाडी (ता. पुरंदर) येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट झाला. या परिसरात गट नंबर ११८ मध्ये मुले क्रिकेट खेळत होती. त्यावेळी अचानक शुभमच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये तो तबब्ल ८ ते १० फूट लांब उचलून फेकला गेला, त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या सोबत खेळत असलेल्या कोणत्याही मुलाला दुखापत झाली नाही. दरम्यान या घटनेचा, पुरंदर तहसील कार्यालयातील महसूल विभागाकडून मंडलाधिकारी राजाराम भामे यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सासवड पोलिस ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत.