बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळें समोर अंकिता पाटील-ठाकरे यांचा टिकाव लागणार का? वाचा सविस्तर
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. मात्र, भाजपने ए फॉर अमेठी व बी फॉर बारामती अशी घोषणा केल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची देशभरात चर्चा सुरू झाली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात दौरे करून वातावरण तापवले होते. भाजपने शरद पवार यांचे पुतणे व खासदार सुप्रिया सुळे यांचे चुलतबंधू अजित पवार यांना जवळ करून शरद पवार यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे राज्यातील गणिते बदलली आहेत. यामध्ये प्रामुख्याने बारामतीचा समावेश आहे. अजित पवार यांच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. बारामती मतदारसंघात उमेदवार कोण असेल, याचे पत्ते भाजपने अद्यापही खुले केले नाहीत. मात्र, सहा महिन्यांपासून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांचे नाव चर्चेत आले आहे.
भाजपने पुणे जिल्ह्याच्या युवा मोर्चाची जबाबदारी अंकिता पाटील यांच्यावर सोपवली आहे. अंकिता पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली असून युवकांचे संघटन वाढवले आहे. त्यांना पाटील कुटुंबाचा राजकीय वारसा आहे. त्यासोबतच ठाकरे कुटुंबाच्या त्या सून आहेत. त्यांचे सासरे दिवंगत बिंदूमाधव ठाकरे, पती निहार ठाकरे यांनाही समाजात एक स्थान आहे.
अंकिता यांचे चुलतआजोबा दिवंगत शंकरराव पाटील यांनी दोन वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली असून सलग २८ वर्षे इंदापूरचे आमदार व १५ वर्षांपेक्षा अधिक काळ राज्याचे मंत्री म्हणून काम केले आहे. वडील हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेच्या चार निवडणुका जिंकल्या असून १९ वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम केले आहे. नुकताच झालेल्या अंकिता पाटील-ठाकरे यांच्या वाढदिवसाला त्यांचे भावी खासदार असे फ्लेक्स बोर्ड झळकल्याने त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
अंकिता पाटील यांच्या आजी रत्नप्रभा पाटील यांच्या निधनानंतर २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या बावडा-लाखेवाडी गटाची पोटनिवडणूक लागली होती. ती पोटनिवडणूक अंकिता पाटील यांनी लढवली होती. राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व उमेदवारांत विक्रमी मताधिक्क्याने त्या विजयी झाल्या आहेत.
अंकिता पाटील यांचा मतदारसंघातील जनसंपर्क दांडगा आहे. इंदापूर तालुका त्यांनी पिंजून काढला आहे. एस. बी. पाटील शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांशी सातत्याने त्या संवाद साधत असतात. त्यासोबतच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करून आढावा घेत असतात. शाळा, महाविद्यालयांत मुलींसाठी व्याख्याने देतात. बचत गटांच्या महिलांशी हितगुज साधून त्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. युवा मोर्चाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
अंकिता पाटील सोशल मीडियावर ॲक्टिव मोडमध्ये असतात. त्यांनी केलेली कामे, भेटीगाठी सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यामातून पोहोचविण्याचे काम करतात. फेसबुक, इन्टाग्राम तसेच व्हॉट्सॲपचा वापर प्रभावीपणे करतात. केंद्र सरकारच्या कामकाजाचे कौतुक सोशल मीडियावरून करतात. यासाठी त्यांची एक टीम आहे.
खासदार सुप्रिया सुळे गेल्या १५ वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्यांना अनेक वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. मतदारसंघात त्यांचा संपर्क दांडगा असून, मतदारांशी भावनिक नाते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांना येणाऱ्या निवडणुकीत सहानुभूतीचा फायदा मिळू शकतो. अंकिता पाटील या नवख्या उमेदवार असल्यामुळे त्यांच्या पारड्यामध्ये मतदार वजन टाकणार का ? हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाला सुटणार, यावर बरेचसे अवलंबून राहील. भाजपला मतदारसंघ सोडल्यास अंकिता पाटील यांच्याशिवाय दुसरा तुल्यबळ उमेदवार सध्या तरी दिसत नाही. गेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांचा एक लाख ५६ हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. आता त्या इच्छुक नसल्याचे समजते.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जागा सुटल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावांची चर्चा आहे. अंकिता पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तरी त्या पक्षाविरोधात बंडखोरी करणार नाहीत. पक्षाने जर याठिकाणी दुसरा उमेदवार दिला तरी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे त्या पालन करतील अशी चर्चा मात्र सगळीकडे ऐकायला मिळत आहे.