भाटघर धरणाने तळ गाठल्याने होऊ लागले पूर्वीच्या “लेक व्हायटींग” धरणाचे दर्शन; काय आहे या पूर्वीच्या धरणाचा संपूर्ण इतिहास सविस्तर वाचा
भोर : भाटघर धरणात पाण्याने तळ गाठल्याने भाटघरच्या आतील लेक व्हायटींग धरणाचे दर्शन होऊ लागले आहे. तसेच धरण भरल्यानंतर पाण्यात बुडणारी पांडवकालीन दोन मंदिरेही दिसू लागली आहेत.
इंग्रजांच्या राजवटीत १८८१ साली धरण बांधण्याच्या उद्देशाने उत्तर बाजुस संगमनेर(ता.भोर) गावच्या हद्दीपासून ते दक्षिण बाजूस भाटघर गावच्या हद्दीपर्यंत १८ मीटर उंचीची भिंत बांधण्यात आली. या भिंतीचे काम ११ वर्षांनी १८९२ साली पूर्ण झाले. यावेळी या धरणाला लेक व्हायटींग असे नाव देण्यात आले. लेक व्हायटींग धरणात ५.२० टीएमसी एवढा पाणीसाठा साठू लागला. परंतु हे पाणी अपुरे पडू लागल्याने मोठे धरण बांधण्याच्या उद्देशाने धरणाच्या भिंतीलगत पूर्वेला ५७.९१ मीटर उंचीची भिंत बांधण्यात आली. या धरणाचे काम १९२७ साली पूर्ण झाल्यानंतर या धरणाला भाटघर धरण(येसाजी कंक जलाशय) असे नाव देण्यात आले. या धरणात २३.७५ टीएमसी एवढा पाणीसाठा साठू लागला.
लेक व्हायटींग धरणाच्या भिंतीपेक्षा भाटघरची भिंत ३९.९१ मीटर उंच आहे. पाऊस काळात लेक व्हायटींग धरणाच्या भिंतीच्या वर पाण्याची पातळी गेल्यानंतर लेक व्हायटींग धरणाचे दर्शन गायब होते. दरवर्षी एप्रिल मे महिन्यात भाटघरच्या पाण्याची पातळी ५.२० टीएमसी पेक्षा खाली गेल्यानंतर लेक व्हायटींग धरण दिसू लागते.
तसेच भाटघर धरणात संपूर्ण जमीन भोर संस्थानाची गेल्यामुळे भोर संस्थानाचे येथील शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या शेत साऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने विंग(सध्या खंडाळा तालुका) आणि विंझर (सध्या वेल्हा / राजगड तालुका) ही दोन गावे ब्रिटिश इंडिया मधून तत्कालीन भोर संस्थानात सामील केली.
धरण बांधण्या अगोदर पांडव काळात दक्षिण बाजूस वेळवंड गावच्या हद्दीत तर उत्तर बाजूस कांबरे गावच्या हद्दीत दोन मंदिरे बांधण्यात आली होती. ही दोन्हीही मंदिरे पाऊस काळात धरणाच्या पाण्यात बुडत असतात. एप्रिल मे महिन्यात धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर ही मंदिरे दिसू लागतात. यावेळी ही मंदिरे बघण्यासाठी पर्यटकांची तसेच इतिहास संशोधकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.