पसुरे गोळीबार प्रकरणातील ‘कर्नल’चा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
भोर : पसुरे(ता.भोर) येथे दि. १५ मे रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी कर्नल हितेश सिंग यास भोर पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. यांनतर त्याने जामिनवर सुटका मिळवण्यासाठी पुणे येथील ॲडिशनल सेशन कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने सदरचा जामीन अर्ज फेटाळला असल्याने कर्नल हितेश सिंग याचा येरवडा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
गेल्या बारा दिवसांपूर्वी भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील परिसरात पसुरे येथे जमिनीच्या वादातून कुंजवन रिसॉर्टचे मालक असणाऱ्या कर्नलने शेतकऱ्यांना भीती दाखवण्यासाठी हवेत दोन वेळा गोळीबार केला होता. त्याने स्थानिक शेतकयांच्या खाजगी जमिनीमध्ये विजेचे पोल उभे केल्याने त्याला जाब विचारण्यासाठी अशोक गेनबा बिऱ्हामणे, प्रकाश तुकाराम शेलार, शंकर दिनकर बिऱ्हामणे, सोनबा कोंडीबा बि-हामणे, चंद्रकांत कुरंगवडे आदी शेतकरी गेले होते. यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दीक वादावाद झाला होता. यादरम्यान सिंगने शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी हवेत दोन गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली होती. भोर पोलिसांनी भोरच्या कोर्टात आरोपीला हजर केले असता कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांनतर जामिनवर सुटकेसाठी पुणे येथील ॲडिशनल सेशन कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने सदरचा जामीन अर्ज फेटाळला असल्याने कर्नल हितेश सिंग याचा येरवडा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.