कात्रज नवीन बोगद्यात झालेल्या अपघातात बावड्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू
कात्रज : पुणे-सातारा रोडवर कात्रज नवीन बोगद्यात आज बुधवारी(दि. २९ मे) सकाळी झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विश्वास धापटे (वय ४८ वर्ष, रा. बावडा ता. खंडाळा, जि. सातारा) असे या अपघातात मयत झालेल्या पुरुषाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाला सकाळी पावणेअकराच्या सुमारास पुणे-सातारा रोडवर कात्रज नवीन बोगद्यामध्ये एका दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना दुचाकीचालक विश्वास धापटे हे बोगद्यामध्ये रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला होता. वाहतूक विभागाकडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याला व रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वाराला नवले हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघात नेमका कसा झाला? याबाबत काहीही माहिती मिळाली नसून भरती विद्यापीठ पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.