भोर तालुक्यातील निगडे येथील शेतशिवारात बिबट्याची दहशत, अनेक शेतकर्यांना दर्शन
कापूरहोळ : गेल्या एक महिन्यापासून निगडे(ता.भोर) येथील शेतशिवारात काम करणार्या शेतकर्यांना बिबट्या सदृश्य प्राणी दिसत होता; परंतु सोमवारी(दि. १२ फेब्रुवारी) रोजी रात्री शेतकर्यांना एकाच वेळी बिबट्याने दर्शन दिसल्याने तो बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले असून वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निगडे(ता.भोर) गावातील शेत शिवारात सोमवारी(दि. १२ फेब्रुवारी) रात्री ११ च्या सुमारास स्थानिक शेतकरी संजय किसन मालुसरे हे शेताला पाणी देत असताना त्यांना त्यांच्या समोरून एक प्राणी पळतांना दिसला. मालुसरे यांच्या बरोबरच चार-पाच शेतकर्यांनाही बिबट्या पळताना दिसला.
पाहता पाहता ही बातमी वार्यासारखी परिसरात पसरली. आज सकाळी शेतकऱ्यांनी ही बाब निगडे गावच्या सरपंच नाजुका किशोर बारणे यांच्या कानावर घातली. त्यांनी लगेच भोर वन विभाग अधिकारी संग्राम जाधव यांना फोन वरून ही माहिती दिली. जाधव यांनी ही माहिती संबंधित वनरक्षक आणि वनपाल यांना दिली असून आज सायंकाळी ८ च्या दरम्यान लोकांना सूचना व जनजागृती करण्यासाठी वन विभागाचे फिरस्ती पथक निगडे गावात पोहोचणार असल्याचे वनविभाग अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.