“रस्त्यावरच्या खड्ड्यांचा प्रश्न सुटतच नसेल तर टोल घेता कशाला?”, सेवा रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहनांच्या लांबच लांब रांगा; खेड शिवापूर टोलनाक्या विषयी वाहन चालक संतप्त
खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते सारोळा या दरम्यान वरवे, खेड-शिवापूर या ठिकाणी उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. त्यामुळे तेथील वाहतूक सेवा रस्त्याने वळविली आहेत, मात्र याच सेवा रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने या दरम्यान मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. जर रस्त्याचे काम पूर्ण नसेल, आणि रस्त्यांवर खड्डे पडले असतील तर टोल नक्की घेताय कशाचा? असा प्रश्न पर्यटकांसह संतप्त झालेल्या वाहन चालकांनी केला आहे.
सन २०१० मध्ये टोल नाका सुरू झाला आहे, मात्र चौदा वर्षे होत आली तरीही रस्त्यावरील उड्डाण पुलांची कामे अपूर्ण आहेत. तर दुसरीकडे सेवा रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गेल्या चौदा वर्षात रस्ता अपूर्ण असताना देखील टोल वसुली कशी सुरू आहे याचे उत्तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुध्दा देऊ शकत नाही असे म्हणाले तरी वावगे ठरणार नाही.
दरम्यान खेड शिवापूर फाट्यावरील वरवे(शिवरे) फाट्यावरील उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत. त्यामुळे तेथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळविली आहे. परंतु काम करणाऱ्या ठेकेदाराने सेवा रस्त्याचे काम करणे गरजेचे होते, ते केले गेले नाही. अनेक स्थानिक नागरिकांनी सांगून देखील ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
ठेकेदारावर कोणाचा वरदहस्त
खेड शिवापूर फाट्यावरील सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम हे संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे सुरू आहे अशी चर्चा भागातून होत आहे. मात्र या ठेकेदाराला कोणी पदाधिकारी अथवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्याकडून विचारणा होत नाही हे नवलच. त्यामुळे या ठेकेदाराला नक्की कोणाचा वरदहस्त आहे हे अद्यापही समजू शकले नाही.
“नॅशनल हाय वे” आहे की, एखाद्या गल्लीतील रस्ता? असा प्रश्न रस्त्यावरील खड्डे व साठलेले पाणी पाहून रोज वाहनचालकांना पडत आहे. किरकोळ पावसात नॅशनल हाय वे ची ही अवस्था होत असेल तर संपुर्ण टोल वसुली तात्काळ बंद करावी. NHAI गेल्या १० वर्षा पासुन ईथे रिलायन्सचा घरगडी म्हणून काम करीत आहे. टोल वसुली बंद करण्याबाबत शुक्रवारी NHAI ला टोलनाका हटाव कृती समिती तर्फे निवेदन देण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.