वरंधा घाट होणार उद्यापासून वाहतुकीसाठी खुला
महाड : रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील वरंध ते रायगड जिल्हा हद्दीत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ८ एप्रिल पासून ते ३० मे २०२४ पर्यंत वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. तशी सूचनाही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली होती.
परंतु प्रवाशांच्या मागणीनुसार व महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने उद्या बुधवार(दि. १ मे) पासून फक्त पुढील आठ दिवसांसाठी हा रस्ता खुला केला आहे. सध्या लग्नसराई तसेच उन्हाळ्याची सुट्टी, आणि निवडणूक पाहता कोकणात येणारे प्रवासी यांची हेळसांड होऊ नये तसेच या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळोवेळी केलेल्या मागणीची दखल घेत संबंधित जिल्हाधिकारी आणि प्रशासनाशी चर्चा करून आमदार गोगावले यांनी उद्या दि. १ मे पासून ते दि. ८ मे पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिल्याचे सांगितले आहे. यामुळे प्रवासी वर्गाकडून आणि जनते कडून त्यांचे आभार व्यक्त होत आहेत.