चालू विद्युत प्रवाहाची तार अंगावर पडून विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू; भोर तालुक्यातील तांभाड येथील घटना
नसरापूर : तांभाड(ता. भोर) येथे रानात चरण्यासाठी गेलेल्या बैलाचा चालू विद्युत प्रवाहाची तार तुटून अंगावर पडून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी(दि. २७ जुलै) घडली आहे. भोर तालुक्यातील आठवडा भरातील ही तिसरी घटना असल्याने वीज वितरण कंपनीबाबत स्थानिक नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांभाड येथील शेतकरी काळूराम बारकू सोंडकर हे त्यांच्या बैलाला घेऊन चरण्यासाठी गावाजवळील शेतात गेले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून भोर तालुक्यात सर्वदूर संततधार पाऊस होत आहे. यादरम्यान शेतात वीज वितरण कंपनीच्या पोलवर असणारी विद्युत तार अचानक बैलाच्या आंगवर तुटून पडली. या तारेतील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने या बैलाचा जागीच मृत्यू झाला. सोंडकर यांना हे लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत स्थानिक विद्युत कर्मचारी यांना माहिती दिली. विद्युत कर्मचाऱ्याने त्यानंतर येऊन विद्युत प्रवाह थांबवला. या घटनेनंतर प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे. तसेच यावेळी उपस्थित असणारे तांभाड गावचे सरपंच अमोल शिळीमकर यांनी वीज वितरण कंपनीकडून या घटनेची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. नुकसान भरपाई न दिल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.