कापूरव्होळ-भोरचा रस्ता खचला; नवीन रस्ता खचल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी
कापूरहोळ : कापूरव्होळ-भोर रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असुन आळंदे(ता.भोर) गावच्या हद्दीतील एस.टी. बस स्टॉप शेजारील मोरीवर निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने रस्ता खचला आहे. यामुळे या ठिकाणावरून जाताना वाहनांना ब्रेक लावून वेग कमी करावा लागत आहे. नवीन रस्ता खचल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिक संबंधित ठेकेदारा विरोधात नाराजी व्यक्त करीत आहेत.
गेल्या एक वर्षापासून कापूरव्होळ-भोर-वाई रस्त्याचे काम सुरू आहे. कापूरव्होळ पासून सांगवी पर्यंत अंदाजे एक किलोमीटर रस्त्याचा भाग वगळता सांगवी पर्यंत दोन्ही बाजूचे काम पूर्ण झाले आहे. सांगवी पासून एक बाजू बुवासाहेब वाडी पर्यंत पूर्ण झाली आहे तर बुवासाहेब वाडी येथील मोरी जवळ अर्धा किलोमीटर रस्त्याच्या भागाचे काम रखडले आहे.
नवीन रस्ता खचणे ही आश्चर्याची बाब आहे. लवकरात लवकर संबंधित ठेकेदाराच्या कंपनीने या ठिकाणी दुरुस्ती करावी तसेच आळंदे गावच्या हद्दीतील एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरू असून ते ठेकेदाराने गुणवत्तापूर्वक करावे. अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.