भोर तालुक्यात नवीन ४८ शिक्षकांच्या नियुक्त्या; ९ शाळा अद्यापही शिक्षकविना
भोर : भोर तालुक्यात शून्य शिक्षक असलेल्या ३८ शाळांमधील फक्त २९ शाळांवर ४८ नवीन शिक्षकांची मंगळवारी (दि. १२ मार्च) पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु ९ शाळा अद्यापही शिक्षकविना राहिल्या आहेत. शासन आदेशाला डावलून समायोजन बदल्या करण्यापूर्वीच नवीन शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामुळे तालुक्यातील कार्यरत असलेल्या शिक्षकांवर आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाने अन्याय केल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
नियुक्ती झालेल्या शिक्षकांमध्ये २९ उपशिक्षक, १६ पदवीधर आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या ३ शिक्षकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी गेल्या महिन्यात शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेला पत्र देण्यात आले होते. तरीदेखील तालुक्यातील कोंढाळकर वस्ती, मानटवस्ती, राजीवडी, चव्हाणवाडी, उदयखानवाडी, धनावडेवाडी, वर्पेवाडी आणि राऊतवाडी या ९ शाळा अजूनही शिक्षकाविणा राहिल्या आहेत.
शिक्षकांची नियुक्ती केलेल्या शाळा खालीलप्रमाणे
धामणदेव, शिंद, वाकांबे, कांबरे बुद्रक, कुंड, मादगुडेवाडी, कारी, घोलप आवाड, करंजगाव, साळुंगण, खुलशी, कोंडगाव, उंबर्डे, भानुसदरा, कारी-मागले आवाड, गोळेवाडी, कांबरे खुर्द, पऱ्हर बुद्रुक, लव्हेरी, घोरपडेवाडी, कारुंगण, जयतपाड, दामगुडेवाडी, भाड्रवली, पाचलिंगे, घेवडेश्वर, मिरकुटवाडी, रेणुसेवाडी व वेणुपुरी.