भोरला टेम्पोच्या धडकेत वेनवडीतील इंजिनियर तरुणाचा मृत्यू; परिसरात शोककळा
भोर : भोर- महाड मार्गावरील वेनवडी(ता.भोर) येथील महांगीरीच्या ओढ्यात आज बुधवारी(दि.१० जून) सकाळी आठच्या दरम्यान भरधाव वेगात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीला समोरून दिलेल्या जोरदार धडकेत अतुल मारुती शिंदे (वय ३२ वर्ष, रा.वेनवडी) या तरुणाचा मृत्यू झाला असून या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. मयत अतुल शिंदे हा मेकॅनिकल इंजिनियर असून तो पुणे- सातारा महामार्गावरील डब्ल्यूओएम या कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत होता. या घटनेबाबत शुभम नंदू साळेकर यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोरवरून महाडकडे तरकारी भरून भरधाव वेगात जाणारा टेम्पो (एमएच ६ बी डब्ल्यू ८०५६ ) याने वेनवडी बाजूकडून येणाऱ्या दुचाकी(एमएच १२ एनएन ४८४७) गाडीवरील दोन तरुणांना समोरून जोरदार ठोकर दिली. या घटनेत दुचाकीवरील दोघांनाही टेम्पोने काही अंतर फरपटत नेल्याने वेनवडी येथील अतुल शिंदे याचा मृत्यू झाला. तर दुसरा शुभम साळेकर गंभीर जखमी झाला. जखमी तरुणास भोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टेम्पो चालक रामचंद्र सर्जेराव बांदल(मुळ रा.पिसावरे ता. भोर सध्या रा. बिरवाडी ता. महाड) यास तात्काळ भोर पोलिसांनी अटक केली. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीप्ती करपे तसेच पोलीस हवालदार राहुल मखरे करीत आहेत. तालुक्यातील एक इंजिनियर तरुण अपघातात गेल्याने तरुणांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.