धक्कादायक! कोकणातील जंगलात अमेरिकन महिला सापडली साखळ दंडांनी बांधलेल्या अवस्थेत
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली आणि रोणापाल या गावांच्या सीमेवरील दाट जंगलात आज एक महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडालीये. ही महिला गेली तीन दिवस या जंगलात बांधलेल्या अवस्थेत होती.
काही गुराख्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर डोंगरावरून तिला खाली आणत उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. हा प्रकार तिच्या नवर्याने केल्याचा संशय आहे. संबंधित महिलेचे नाव ललिता कायी कुमार एस असे असून ती तामिळनाडूमधील रहिवासी आहे.
ती मूळ अमेरिकन नागरिक असल्याचे समजते. उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंद्याला लॉक करण्यात आले होते. बाजूला पाण्याची बाटली, पिशवी ठेवली होती. हे ठिकाण मडुरा रेल्वेस्थानकापासून जवळ असल्याने रेल्वेतून आणून संबंधित महिलेला या जंगलात आणत बांधून ठेवल्याचा अंदाज आहे.
मुसळधार पाऊस आणि सलग तीन दिवस उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती. आज त्या भागात सोनुर्लीतील काहीजण गुरे चारण्यासाठी गेले असता आवाज आला. त्यांनी जवळ जावून पाहिल्यावर हा गंभीर प्रकार पुढे आला. पोलिसांना कळवल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. तिला साखळदंडातून सोडवत तेथीलच लाकडांची डोली करून खाली आणण्यात आले. घटनास्थळी संबंधित महिलेचे आधारकार्ड मिळाले आहे. सदर घटनेबाबत सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.