खेड-शिवापूर येथे सौंदर्य प्रसाधनांच्या आडून मद्याची तस्करी करणारा ट्रक ताब्यात; दीड कोटीचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
खेड-शिवापूर : सौंदर्य प्रसाधनाच्या नावाखाली गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सासवड यांनी कारवाई केली आहे. या कारवाईत मद्यासह दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला अटक केली आहे. सुनिल चक्रवर्ती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई आज बुधवारी(दि.१० जून) सातारा-पुणे हायवेवरील खेड-शिवापूर गावच्या हद्दीतील हॉटेल जगदंब समोर करण्यात आली.
राज्य उत्पादन विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांना सातारा-पुणे महामार्गावरुन गोवा राज्यात विक्रीकरता असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सासवड विभागाच्या पथकाने मोहिम राबवुन वाहनांची तपासणी केली. बुधवारी खेड शिवापूर गावच्या हद्दीतील हॉटेल जगदंब समोर एक १४ चाकी संशयित भारत बेंज कंपनीचा ट्रक (एचआर ६३ डी ८८७८) थांबवला. चालकाकडे ट्रकमधील सामानाबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. पथकाला संशय आल्याने ट्रकची तपासणी केली असता, वाहनामध्ये गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असलेल्या रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ७९ हजार ६८० सिलबंद बाटल्या(१६६० बॉक्स), ७५० मिली क्षमतेच्या ६४८० सिलबंद बाटल्या (५४० बॉक्स) मिळाले. या कारवाईत पथकाने ट्रक व मद्य असा १ कोटी ५१ लाख ६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक सुनिल चक्रवर्ती याला अटक केली आहे. आरोपीवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, मुंबई आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे यांच्या आदेशाने पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर, अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक प्रदीप मोहिते, राम सुपेकर, रोहित माने, धवल गोलेकर, सहायक दुय्यम निरीक्षक सागर दुर्वे, संदीप मांडवेकर, जवान भागवत राठोड, तात्या शिंदे, समीर पडवळ, अक्षय म्हेत्रे, रणजित चव्हाण, राम चावरे, सुनील कुदळे, दत्तात्रय पिलावरे, अंकुश कांबळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाचे प्रदीप मोहिते करीत आहेत.