दुर्गम भागातील शाळांना ४० संगणक व १५ सौर पॅनल सिस्टीमचे वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा महत्वाकांक्षी प्रकल्प
भोर : दुर्गम भागातील शाळांमधील भौतिक सुविधांची गरज लक्षात घेऊन ध्रुव प्रतिष्ठानने एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. दुर्गम भागातील शाळांना पटानुसार संगणक व सौर पॅनल सिस्टीम चे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ४० संगणक व १५ सौर पॅनल सिस्टीमचे वाटप केलं असून, याची सुरुवात कर्नावड(ता.भोर) केंद्रातील शाळेतून करण्यात आली असून त्यानंतर नाझरे झुलता पूल, नाझरे गावठाण, कर्णावड, रावडी, चिखलगाव,धोंडेवाडी या ठिकाणी संगणक वाटप तर टिटेघर, वडतुंबी या जिल्हा परिषदेच्या शाळांना सौर पॅनल सिस्टीमचे वाटप करण्यात आले. तसेच दुसऱ्या टप्प्यात आंबवडे केंद्रामध्ये वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये विशेषतः पंधरा पटाच्या पुढील शाळांना संगणक वाटप होणार असून मोठ्या शाळा व हायस्कूल साठी सौर पॅनल सिस्टीम चे वाटप होणार असल्याचे ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले.
सद्यस्थितीत आचारसंहिता असल्यामुळे संच शाळांच्या ताब्यात दिले जात आहेत. ४० संगणक व १५ सौर सिस्टीम वाटप करण्यात आल्यानंतर जून २०२४ मध्ये एका विशेष कार्यक्रमात या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ केला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांचे सौजन्य लाभले आहे. चालू वर्षी संस्थेचे १०० संगणक वाटण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व शिक्षक व शाळा यांचे सहकार्य मिळत आहे. ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी हाती घेतलेल्या या कार्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.