चोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार तात्काळ जेरबंद, सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद सातारा यांचा संयुक्त उपक्रम
शिरवळ प्रतिनिधी : मा. जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री.समीर शेख ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री.ज्ञानेश्वर खिल्लारी यांच्या प्रयत्नातून ,व सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज वार शनिवार दिनांक २८ ऑक्टबर रोजी शिरवळ पोलीस स्टेशन येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमास मा.श्री नवनाथ मदने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरवळ पो.स्टे,श्री शंकर पांगारे पोलीस उपनिरीक्षक,श्री.गणेश लोकरे वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा,श्री.सतिश शिंदे संपर्क अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा,श्रीमती वृषाली देसाई पोलीस उपनिरीक्षक,अब्दुल हादरी बिद्री पोलीस उपनिरीक्षक,श्री.नितीन नलावडे पोलीस गोपनीय अंमलदार, यांच्यासह शिरवळ पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,पत्रकार बांधव, अशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर १८००२७०३६००/९८२२११२२८१ वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री.डी.के.गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले. पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील ४८ तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संयोजन मा.श्री नवनाथ मदने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले.
ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी ५० रुपये प्रति कुटुंब, प्रति वर्ष इतका खर्च येणार आहे. सदर खर्चाची १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करणेबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत.
ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट*
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरीक/ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे.
अफवांना आळा घालणे.
प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.