अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
खेड शिवापूर : वारंवार त्रास देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी २ जणांविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुरुवारी(दि. २९ फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत अल्पवयीन मुलगी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विद्यालयात शिक्षण घेत आहे. संशयित आरोपी क्रमांक १ हा पिडीत मुलीच्या आईच्या मोबाईल वर वारंवार वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून त्रास देत असे. परंतु भितीपोटी पिडीत मुलीने याबाबतीत कोणाला सांगितले नाही. यामुळे त्याचा आत्मविश्वास बळावला, आणि त्याने पुन्हा फोन करून पिडीत मुलीला “मला तु खुप आवडतेस. तु मला हो म्हणाली नाही, तर मी तुझ्या वडीलांचा कार्यक्रम करेन” अशी धमकी दिली. एवढ्यावर न थांबता संशयित आरोपी क्रमांक २ आणि क्रमांक १ यांनी पिडीत मुलगी विद्यालयातून घरी येत असताना तिच्या समोर दुचाकी उभी केली. तेव्हा संशयित आरोपी क्रमांक २ याने पिडीत मुलीला “संशयित आरोपी क्रमांक १ चे तुझ्याकडे काम आहे, त्याला तु खुप आवडती”, असे बोलू लागला. त्यानंतर संशयित आरोपी क्रमांक १ हा मोटार सायकल वरुनच “तु मला आवडते, आय लव यु” असे म्हणून दोघेजण मोटार सायकल वरुन निघून गेले. यापूर्वीही या दोघांनी असाच मोटार सायकलवरून पाठलाग करुन
पिडीत मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याने शेवटी पिडीत मुलीने राजगड पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.
अशाच प्रकरणात अल्पवयीन मुलीने केली होती आत्महत्या
दोन महिन्यांपूर्वी सावित्रीबाईंची मायभूमी असलेल्या सांगवी(नायगाव, ता.खंडाळा) येथे असाच प्रकार घडला होता. वारंवार त्रास देणाऱ्या मुलांच्या भीती व नैराश्यपोटी अल्पवयीन मुलीने गळफास घेत “आरोपीला शिक्षा करा” अशी चिठ्ठी लिहून शेवटची इच्छा व्यक्त करत जीवन संपवले होते.
राजगड पोलिसांनी सदर घटनेचा तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी. तसेच अशा प्रकारे जर “रोड रोमियो” विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलींना भर दिवसा त्रास देत असतील तर ही खूप निंदनीय बाब आहे. परंतु मुली, तरुणींनी घाबरून न जाता अशा “रोड रोमियोंची” माहिती आमच्याकडे द्यावी. युवासेनेच्या माध्यमातून अशांना योग्य तो धडा शिकवला जाईल.
-रोहिदास आबा कोंडे(उ.बा.ठा युवासेना सचिव, पुणे जिल्हा)