पुणे जिल्ह्यातील ४१३ गावात खाणकाम, उत्खनन आणि वाळू उपसावर बंदी; संवेदनशील क्षेत्राच्या यादीत समावेश
पुणे : देशभरात मान्सून सक्रीय झाल्यानंतर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेल्या केरळ राज्यातील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे जवळपास २०० नागरिकांनी आपला जीव गमावला.
परिणामी महाराष्ट्रासह सहा राज्यात विस्तारलेल्या पश्चिम घाटाच्या सुरक्षेसाठी अनेक ठिकाणांना संवेदनशील क्षेत्र(Eco Sensitive Zone)म्हणून निश्चित करण्यात आले आहे. यात पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ४१३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. संवेदनशील क्षेत्राच्या यादीत समाविष्ट केलेल्या गावांमध्ये भोर, राजगड(वेल्हे), मुळशी, पुरंदर, मावळ, खेड, जुन्नर, हवेली आणि आंबेगाव या तालुक्यातील ४१३ गावांचा समावेश आहे.
पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण(NGT) पश्चिम विभागीय खंडपीठाने जारी केलेल्या सुचनेनुसार तेथे काही काळासाठी नवीन खाणकाम, उत्खनन आणि वाळू उपसावर बंदी घालण्यात आली आहे. या भागात वीजनिर्मिती प्रकल्प, धरण उभारणी, औद्योगिक प्रकल्पावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या विरोधात २०२३ मध्ये अधिवक्ता लक्ष्यवेद ओढेकर आणि इंद्रायणी पटानी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.