रामोसवाडी(हातनोशी) येथे घराचे पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
भोर : भोर तालुक्यात चार दिवसांपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसात विसगाव खोऱ्यातील रामोसवाडी(हातनोशी, ता.भोर) येथील शेतकरी पांडुरंग सदाशिव बोडरे यांच्या घराचे पत्रे आज बुधवारी(दि.२४ जुलै) वाऱ्याने उडून गेले असून शेतकऱ्याचा घरसंसार मुसळधार पावसात उघड्यावर पडल्याने भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे तालुक्यात बहुतांशी ठिकाणी झाडे पडणे, वीज वाहकतारांचे पोल पडणे, घराच्या भिंती कोसळणे, घरांचे पत्रे उडून जाणे असे प्रकार घडत आहेत. पांडुरंग बोडरे यांच्या घरावरील पत्रे जोरदार वाऱ्याने मुसळधार पाऊस सुरू असताना उडून गेले. त्यामुळे घरातील धान्य, कपडे, जनावरांचा वाळका चारा तसेच इतर संसार उपयोगी वस्तू पूर्णता भिजून जाऊन नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ घडलेल्या घटनेचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी विसगाव खोऱ्यातील नागरिकांकडून होत आहे.