गुजरातच्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री शिंदेंच्या गावाजवळ खरेदी केली तब्बल ६२० एकर जमीन? जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू
महाबळेश्वर : गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी महाबळेश्वरमध्ये ६०० एकरहून अधिक जमीन खरेदी केल्याची गंभीर तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आणि देशात एकच खळबळ उडाली. नंदुरबारचे रहिवासी असलेले आणि सध्यागुजरातमधील अहमदाबाद येथे मुख्य जीएसटी आयुक्त असलेल्या चंद्रकांत वळवी यांनी ही जमीन खरेदी केल्याची तक्रार आहे. कांदाटी येथे त्यांनी ही जमीन खरेदी केली आहे. याबाबत तक्रार झाल्यानंतर सातारा जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिलेत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या गावापासून ३० किलोमीटर अंतरावर ही जमीन
चंद्रकांत वळवी, त्यांचे नातेवाईक अशा सुमारे 13 जणांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथे संपूर्ण गाव खरेदी केलं आहे. त्यामुळे तेथील ६२० एकर जमीन त्यांच्या ताब्यात गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे तांब हे गावही महाबळेश्वर तालुक्यातच आहे. मुख्यमंत्र्यांच्या गावापासून वळवी यांनी खरेदी केलेली जमीन ३० किलोमीटर अंतरावर आहे. आता तिथं बांधकामांनाही सुरूवात झाली असून त्यामुळं पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६, वन (संवर्धन) कायदा, १९७६ आणि वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचं तक्रारीत म्हटले आहे.
सुशांत मोरे यांनी नेमके काय आरोप केलेत?
मोरे म्हणाले, झाडाणी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनजवळ आहे. घनदाट जंगलामुळे हा वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास आहे. झाडाणी येथील एका पुनर्वसित शेतकऱ्याची भेट घेतली असता त्याने सांगितले की, आता तुमचे पुर्नवसन झाले. तुमची मुळ गावातील जमीन शासन जमा होणार आहे. ती जमीन शासनाला दिल्यापेक्षा आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला पैसे देऊन असं म्हणत आठ हजार रुपये प्रति एकर या दराने जमीन बळकावली. यावेळी अधिकृत बांधकाम, खोदकाम, वृक्षतोड व अंतर्गत जागेत अवैध रस्ते काढून, वन हद्दीतून वीज पुरवठा करून पर्यावरणाची मोठी झाली आहे.
काठ्या-कुऱ्हाडी घेतलेले पहारेकरी
झाडाणी गावात जाण्यास इतर नागरिकांना मज्जाव केला जात आहे. याठिकाणी काठ्या-कुऱ्हाडी घेऊन काही जणांचा पहारा आहे. त्यांच्या भाषेवरून ते धुळे-नंदुरबार भागातील आदिवासी समाजाचे लोक असण्याची शक्यता आहे. तसेच याठिकाणी सीसीटीव्हीचाही वॉच आहे. रेणुसे ते झाडाणीवरून उचाट ते रघुवीर घाट हा दोन पदरी रस्तादेखील होत आहे. या रस्त्याची आवश्यकता नसतानाही रस्ता कशासाठी केला जात आहे, हा प्रश्नही यामुळे उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडेही सुशांत मोरे यांनी लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत जितेंद्र डुडी यांनी वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. झाडाणी येथे झालेल्या गैरप्रकारांबाबत प्रांत राजेंद्रकुमार जाधव यांनी महाबळेश्वर तहसीलदारांना दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला चौकशीचे आदेश
महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावात जे खोदकाम आणि बांधकाम झाले आहे, त्यासंदर्भात महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिले आहेत
अन्यथा बेमुदत उपोषण करणार – सुशांत मोरे
दरम्यान, या प्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनातील सर्व जबाबदार घटकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश पारित करावेत, अन्यथा १० जून २०२४ पासून सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला.