पुणे-सातारा महामार्गावर कामथडी गावच्या हद्दीत एसटी-मोटारसायकल अपघातात पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर जखमी; बस चालकावर गुन्हा दाखल
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर कामथडी(ता.भोर) गावच्या हद्दीत एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी(दि. १५ ऑगस्ट) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत जगदीश शिवाप्पा धुम्मा(वय ४६ वर्ष, रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनम कुमार दिनेश सिंग(वय ३३ वर्ष, रा. पळशी, ता. खंडाळा) हे त्यांची पत्नी पुजा सिंग(वय ३० वर्ष), मुलगा रोनक(वय ५ वर्ष) व मुलगी पंकुडी(वय ३ वर्ष) यांच्या बरोबर मोटरसायल(एम.एच. १२ एन.जी.१७७५) वरून पुण्याच्या दिशेने जात असताना सकाळी १० च्या दरम्यान कामथडी (ता.भोर) गावच्या हद्दीत आल्यानंतर मागून येणाऱ्या एसटी बसने(एम.एच. ०७ सी. ७५८३) त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात सनम कुमार सिंग हे गंभीर जखमी झाले असून त्यांची पत्नी पूजा यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच मुलगा रोनक याच्या डोक्यास दुखापत झाली असून मुलगी पंकुडी ही किरकोळ जखमी झाली आहे. या अपघातास एसटी बस चालक जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. दिलेल्या फिर्यादीवरून चालक नवनाथ गोविंद देशमुख(वय ४८ वर्ष, रा. भोर) यांच्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे करीत आहेत.