कापुरहोळ-भोर-मांढरदेवी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलनासाठी निवेदन
भोर : भोर तालुक्यातील सर्वात जास्त वाहतूक असलेल्या कापुरहोळ-भोर ते मांढरदेवी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर दररोज कामा निमित्त पुण्याला जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधत भारतीय जनता पक्षाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या भोर तालुका युवा वॉरियर्सचे अध्यक्ष रोहन भोसले, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष समीर घोडेकर व पुणे जिल्हा युवा मोर्चाचे चिटणीस पंकज खुर्द यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर धुळीचा त्रास कमी होण्याकरता व कामाचा दर्जा उंचावण्याकरता निवेदन दिले आहे. नागरिकांना चांगला रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होताना धुळीमुळे होणाऱ्या त्रासाचा व त्यावर उपाययोजना करण्याच्या गोष्टींचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. दिलेल्या निवेदनावर कारवाई न झाल्यास पंधरा दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा भाजप तर्फे देण्यात आला आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाची योग्य दखल घेऊन संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला योग्य काम करण्याच्या सूचना देण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता खूप महत्त्वाचा असल्याने भविष्यात होणाऱ्या त्रासाचा योग्य विचार करून लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय वाघच यांनी पंधरा दिवसात धुळीपासून होणारा त्रास व पाण्याचा योग्य वापर करून काम उत्तम दर्जाचे होईल याकडे लक्ष देऊन उत्तम दर्जाचा रस्ता होण्यासाठी काम करणार असल्याचे आश्वासित केले आहे.