पुणे-सातारा महामार्गावर ससेवाडी(भोर) गावच्या हद्दीत चार वाहनांचा विचित्र अपघात
खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गावर ससेवाडी(ता.भोर) गावच्या हद्दीतील पुलावर आज शनिवारी(दि.२७ जानेवारी) सकाळी विचित्र अपघात झाल्याचे समोर आले आहे. या विचित्र अपघातात एकूण पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातात ३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल नसरापूर येथे दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस व महामार्ग पोलिस घटना स्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपघात झालेल्या ठिकाणी शुक्रवारी रात्री एक टेम्पो दुभाजक तोडून खांबाला धडकला होता. या अपघातामुळे दुभाजकाचा पत्रा तूटून रस्त्यावर पडला होता. रस्त्यावर मोठा पत्रा आडवा पडल्याने सदर ठिकाणी एक एस टी बस, एक पिक अप, एक मोटारगाडी ही तीन वाहने थांबली होती. तितक्यात पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने या तीन वाहनांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात मोटरगाडी उड्डाणपुलावरुन खाली कोसळली त्यामुळे त्यात असणारे ३ प्रवासी हे गंभीर जखमी झाले असल्याचे समजले आहे. तर एस टी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुलावरून बस कोसळली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र अपघातानंतर याठिकाणी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.