राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आज रविवारी रात्री आठच्या सुमारास नाना पेठेत दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार केला, यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून हल्लेखोर फरार झाले आहेत. या हल्ल्यात वनराज आंदेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालात उपचार सुरू आहेत. मात्र पुण्यात गणेशोत्सवाच्या आधी गोळीबाराची घटना घडल्यने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील कार्यक्रम असल्यामुळे वनराज आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. वनराज आंदेकर हे रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. याच संधीचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी चौकातील लाईट घालवली आणि त्यांनंतर वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. वनराज आंदेकर यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वारही केले.
नानापेठ येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर हा गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या हल्ल्यात वनराज आंदेकर गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच समर्थ पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे. त्यामुळे वर्चस्वाच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान पुण्यातील मध्यवर्ती भागात ऐन गणेशोत्सवाच्या आधी गोळीबारीची घटना घडल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पुणे महापालिकेच्या 2017 सालचा निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्या अगोदर त्यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 अशा दोन वेळा नगरसेविका होत्या. तर वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकात आंदेकर हेही नगरसेवक होते. याशिवाय वत्सला आंदेकर यांनी पुणे शहराचे महापौरपद भुषविले आहे.