‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ८ ऑक्टोबर रोजी जनसुनावणी; महिलांनी न घाबरता आपल्या तक्रारी मांडण्याचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी रोजगार हमी योजना सभागृह, विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन येथे ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
या जनसुनावणीस आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. महिलांना त्यांच्या तक्रारींबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडता यावे यासाठी या जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील कोणतीही पिडीत महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली समस्या लेखी स्वरुपात आयोगापुढे मांडू शकतील.
या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी केले आहे.