तडीपार गुंडाला कुरंगवडी फाट्यावरून गावठी पिस्तुलासह अटक; स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कामगिरी
नसरापूर : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने गावठी पिस्तुलासह कुरंगवडी (ता. भोर) येथील बस थांब्या जवळून अटक केली आहे. शुभम सचिन उफाळे (वय २४ वर्ष, रा. मार्गासनी, ता. राजगड) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्टल, मॅक्झिनसह एक जिवंत काडतूस असा ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक अनुषंगाने बेकायदेशीर रित्या पिस्टल बाळगणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी (दि. १२ नोव्हेंबर) भोर विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार अमोल शेडगे यांना गोपनीय माहिती मिळाली की कोळवडी (ता. भोर) गावच्या हद्दीत नसरापूर – राजगड(वेल्हा) रोड लगत कुरंगवडी (ता. भोर) येथील बस थांब्या जवळ शुभम सचिन उफाळे हा गुन्हेगार एक गावठी पिस्टल कमरेला लावून उभा आहे.
मिळालेल्या माहिती नुसार गून्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लाऊन शुभम उफाळे यांस ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला कोणताही वैध परवाना नसलेला एक गावठी कट्टा मिळून आला व त्याची मॅग्झीन तपासली असता त्यामध्ये एक जिवंत काडतूस सापडले. शुभम उफाळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर या पूर्वी ५ गुन्हे दाखल असून सिंहगड पोलीस स्टेशनने या आरोपीस पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा हद्दीतुन २ वर्षासाठी तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस हवालदार मंगेश ठिगळे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत यांनी केली आहे.