राजगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला! अनेकांची प्रकृती गंभीर !
वेल्हा :- प्रतिनिधी
स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावर या दिवसात पर्यटकांची गर्दी होताना दिसते. परंतु दि. 8 ऑक्टोबर रोजी रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर ट्रेकिंग साठी किल्ल्यावर आले होते.
सकाळी साडे आठच्या सुमारास सुवेळा माची परिसरात किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी जोरदार हल्ला केला. यात तब्बल वीस पेक्षा जास्त पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला. त्यामुळे यातील काही पर्यटकांची प्रकृती गंभीर झाली आहे.मधमाशांनी चावा घेतल्या नंतरही काही पर्यटक मोठ्या धैर्याने स्वतःहून खाली उतरले. तर इतर जखमींना वेल्हा पोलीस आणि स्थानिक लोकांकडून स्ट्रेचर वर टाकून गडावरून खाली आणण्यात आले. माशा जास्त प्रमाणात चावल्याने काही जण तर अक्षरशः बेशुद्ध पडले होते.
सकाळी साडे आठच्या सुमारास सुवेळा माची परिसरात मुंबई, पुणे येथून आलेले पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असतानाच कातळ खडकातून अचानक आग्या मोहोळाच्या मधमाशा मोठ्या संख्येने पर्यटकांवर झेपावल्या. अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने घाबरलेल्या पर्यटकांनी जीव वाचविण्यासाठी वाट मिळेल तिकडे धूम ठोकली. मधमाशा चावल्याने काहींना उलट्यांचा देखील त्रास सुरू झाला. तेथील स्थानिक लोकांनी व पर्यटकांमधील काहींनी जखमींना पद्मावती माचीवर आणले.
यादरम्यान तहसीलदार दिनेश पारगे यांनी जखमी पर्यटकांना तातडीने उपचार मिळण्यासाठी शासकीय रुग्णवाहिकांना सूचना दिल्या. तर दुसरीकडे वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पठारे यांनी पोलिस यंत्रने सहित मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.