पुणे-सातारा महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी; तब्बल १२ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा, “मतदान होते की नाही”? मतदार राजा चिंतेत
खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम रखडल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच पुणे-मुंबईकडून गावाकडे मतदान करण्यासाठी जाणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीत अडकले आहेत. आपले मतदान होते की नाही या काळजीत मतदार पडले आहेत तर प्रशासनाला याबाबत काही घेणं देणं नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस यंत्रणा मतदान कार्यात गुंतल्याने कोंडी सोडवण्यासाठी कोठेही रस्त्यावर पोलीस दिसून आला नाही. मात्र महामार्ग वाहतूक पोलीसांनी वाहतूक नियंत्रण करणे गरजेचे होते.
प्रशासनाचे कायम अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने पुणे सातारा महामार्गावर पुणे येथील नवले ब्रिज पासून ते वरवे (ता. भोर) पर्यंत जवळपास १५ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे सातारा बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर चक्काजाम झाला आहे. खेड शिवापुर तसेच शिवरे (ता. भोर) येथील होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी रस्त्याच्या कामाचा बोजवारा उडाल्याने पुणे मुंबई कडून सातारा, सांगली, कोल्हापूर, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या वाहने उलटसुलट जात असल्याने वाहतूककोंडीत आणखीनच भर पडली आहे.
पुणे सातारा महामार्गावर सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहने मोठी प्रमाणावर असल्या कारणाने नवले ब्रिज, दरीपुल, गोगलवाडी फाटा कोंढणपूर फाटा, खेड शिवापुर टोलनाका, शिवरे, वरवे येथील मार्गावर वाहने अडकले आहेत. गावाकडे जाणारे मतदार हे आपले मतदान होईल की नाही? या चिंतेत असल्याचे दिसून आले. शिवरे येथील उड्डाणपुलाचे काम करणारे निखिल कन्स्ट्रक्शन कडून कामात सुधारणा होत नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.