मकरंद पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट; जिल्ह्याच्या राजकिय वर्तूळात खळबळ
बारामती : अजित पवार गट राष्ट्रवादीचे वाईचे खासदार मकरंद पाटील यांनी आज गोविंद बाग येथे जाऊन खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत असले तरी जिल्ह्याच्या राजकिय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
यावेळी खासदार शरद पवार यांनी आवर्जून किसन वीर कारखाना व खंडाळा कारखान्यांचे गाळप सुरु झाले का, काही अडचणी आहेत का, याची माहिती मकरंद आबांकडून घेतली.
प्रत्येक वर्षी दिवाळीला बारामतीत गोविंद बागला जाऊन खासदार शरद पवार यांना शुभेच्छा देण्याचा पायंडा राष्ट्रवादीच्या नेत्यांत पडला आहे. अगदी लहानात लहान कार्यकर्त्यांपासून ते आमदार, खासदार, मंत्र्यांपर्यंतचे सर्व राष्ट्रवादीचे नेते पवार साहेबांना भेटून शुभेच्छा देतात. पण, राष्ट्रवादीच्या दुफळीनंतरही ही परंपरा बहुतांशी आमदारांनी पाळली असल्याचे चित्र आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार गट राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी आज गोविंद बागेत जाऊन खासदार शरद पवार यांची भेट घेतली. तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, शामराव गाडवे, मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर हे उपस्थित होते.
यावेळी खासदार शरद पवार यांनी वाई तालुक्यातील किसन वीर कारखाना, खंडाळा कारखाना यांच्या गाळपाची स्थिती, तसेच त्यासंदर्भातील काही प्रश्नांची माहिती मकरंद पाटील यांच्याकडून घेतली. तसेच मराठा आरक्षणावर ही साताऱ्यातील नेमक्या स्थितीची माहिती घेतली. दोन्ही नेत्यांत सुमारे पाऊण तास विविध समस्याबाबत चर्चा झाली.