वरंध घाटातील एसटी वाहतूक बंद, नागरिकांचे हाल; एसटी सेवा पुन्हा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
भोर : भोर-वरंध घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी भोर-महाड रस्ता मागील आठ महिने बंद असल्याने राज्य परिवहन महामंडळाची एस. टी. बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, ना रस्ता दुरुस्त झाला ना एस.टी वाहतूक सुरू झाली. यामुळे मात्र भोर पुणे डेपो व इतर डेपोंच्या दररोजच्या ११ फेऱ्या बंद आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू असून खाजगी वाहतूक करणारे दुप्पट तिप्पट प्रवास भाडे घेत आहे. एस.टी सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवासी व नागरिकांनी केली आहे.
महाड हद्दीतील विविध कामे प्रगतिपथावर राजेवाडी (ता. महाड) ते रायगड जिल्हा हद्द या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम,संरक्षक भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठीची कामे प्रगतिपथावर आहेत. सद्यस्थितीत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये (भोर हद्दीपर्यंत) संरक्षक भिंतीचे काम प्रगतिपथावर असून बहुतांश काम पूर्ण झालेले आहे. मात्र, भोर हद्दीतील वरंध घाटातील खोलदरीकडील तुटलेले संरक्षक कठडे अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. मात्र, त्याच रस्त्यावर मोठमोठी वाहने धोकादायकपणे प्रवास करत आहेत. ना रस्ता दुरुस्त झाला ना एस.टी.सेवा सरू झाली. त्यामुळे खाजगी वाहतूक ट्रक चालक जीप चालक नागरिकांकडून प्रवास भाडे म्हणून दुप्पट तीनपट पैसे वसूल केले जात असून प्रवाशांचे मात्र मोठे हाल सुरू आहे.
भोर तालुक्यातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीडी वरंध (ता. महाड, जि. रायगड) ते रायगड जिल्हा हद्द हा वरंध घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी १ एप्रिल ते ३० में असा दोन महिने सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, रस्ता दुरुस्त न झाल्याने व पुढे पावसाळा असल्यामुळे हा वरंध घाट मागील आठ महिने बंद आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाने भोर-महाड रस्त्याने कोकणात जाणाऱ्या भोर डेपोची भोर-महाड बस,पुणे डेपोची पिंपरी चिंचवड ते खेड, पिंपरी चिंचवड ते अहिरेवाडी,पिंपरी चिंचवड ते माखजन, पिंपरी चिंचवड ते दापोली, पुणे ते महाड, जळगाव ते महाड, आंबेजोगाई ते खेड,पोलादपूर ते पुणे, महाड ते पुणे या सर्व ११ गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांचे हाल होत आहेत. एस.टी. बस सेवा बंद झाल्याने प्रवासी नागरिकांचे मोठे हाल होत असून एस.टी सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.